Your Voice, Our Headlines

Download Folkspaper App with no Ads!

BULLETIN

A fast-growing newspaper curated by the online community.

शेती तंत्रज्ञान आत्मसात केले संयमाने शारदाचे शेती उत्पन्न वाढले चारपटीने

  • tag_facesReaction
  • Tip Bones

सौ. शारदा सुभाष पिसे, (४०) ह्या महिला शेतकरी ग्राम पारडी, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ येथे पती, मुलगा व मुलीसोबत राहतात. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत शारदाताई मागील १० वर्षांपासून पतीच्या बरोबरीने एकूण चार एकर ओलीताच्या क्षेत्रावर शेती करीत आहेत. सुरुवातीच्या काळात शेतीचे तंत्रज्ञान उपलब्ध होत नसल्याने त्यांना पारंपारिक तसेच कोरडवाहू पद्धतीने शेती करावी लागली. अनावश्यक निविष्ठा वापरल्यामुळे अवाजवी खर्च होऊन त्यामधून फारच कमी प्रमाणात नफा मिळायचा. अगदी तुटपुंज्या कमाईतून त्यांना घरखर्च भागवणे देखील कठीण झाले होते.

सन २०१८ मध्ये एका कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या रिलायन्स फाउंडेशनच्या संपर्कात आल्या. फाउंडेशनच्या तज्ञांनी शेतीच्या तंत्रज्ञानाविषयी सांगितलेले महत्त्व त्यांना पटले. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून २०१८-१९ या वर्षीपासून त्यांनी फाउंडेशनच्या विविध कार्यक्रम, व्हाट्स अॅप ग्रुप, ध्वनी संदेश, हेल्पलाईन इत्यादी मोफत सुविधांचा लाभ घेत शेती करणे सुरु केले. पिकांना लागणारी पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी कशी पुरवायची, त्यासाठी रासायनिक खतांचा प्रमाणाबाहेर, अवेळी आणि चुकीच्या पद्धतीने होणारा वापर कसा कमी करायचा, मातीचे परीक्षण करून त्यानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास जमीन आणि शेतीचे नुकसान कसे थांबविता येते अशा अनेक बाबी त्यांनी समजून घेतल्या. त्यानुसार त्यांनी सेंद्रीय शेती, दरवर्षी पिकांची फेरपालट, रुंद- वरंबा सरी पद्धतीने लागवड, एकात्मिक पद्धतीने कीड-रोग व्यवस्थापन, पाणी देण्याच्या पद्धती आणि वेळा यांचे सुनियोजन इत्यादी बाबींचा काटेकोरपणे अवलंब केला. वेळोवेळी तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेवून शेतीमध्ये वेळेचे नियोजन करून शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि पर्यायाने त्यांना सन २०१९-२० या वर्षात यापूर्वीच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये भरपूर फायदा झाल्याचे दिसून आले. रिलायन्स फाउंडेशनच्या मार्गदर्शनापूर्वी सोयाबीनचे एकरी ३.५ क्विंटल उत्पादन होत होते, परंतु त्यानंतर ते एकरी ६.०० क्विंटल झाले. कपाशीचे कोरडवाहू स्थितीत एकरी ७ क्विंटलवरून एकरी ११ क्विंटल एवढे उत्पादन वाढले. तसेच कपाशीमध्ये दोन एकरात घेतलेले आंतरपीक तूर पूर्वी त्यांना चार क्विंटलपर्यंत होत होते; ते आता त्यांना आठ क्विंटल झाले. रबी हंगामात हरभरा पिकाचे पूर्वी एकरी पाच क्विंटल उत्पादन होत होते, परंतु मार्गदर्शनानंतर ते एकरी सात क्विंटल झाले. पिकांच्या उत्पादनात झालेली ही वाढ पूर्वीच्या उत्पादनाच्या तुलनेत सरासरी दिडटीपेक्षा अधिक आहे. याशिवाय त्यांनी मशागत, लागवड, बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके , वेचणी-कापणी इत्यादी बाबींवर येणाऱ्या खर्चावर एकूण २१००० रुपयांची म्हणजेच २५ % बचत केली. सन २०१९-२० च्या खरीप हंगामात त्यांनी दोन एकरात सोयाबीनचे १२ क्विंटल उत्पादन घेऊन ते रु. ३,१०० प्रती क्विंटल दराने रु. ३६,२०० ला विकले. दोन एकरातच १४ क्विंटल कापूस पिकवून तो रु. ५,००० प्रती क्विंटल दराने रु. ७०,००० ला विकला. याच कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून तुरीचे आठ क्विंटल उत्पादन घेऊन ती रु. ५,००० प्रती क्विंटल दराने रु. ४०,००० ला विकली. तसेच रबी हंगामात एक एकरात हरभऱ्याचे सात क्विंटल उत्पादन घेऊन तो रु. ४२,०० प्रती क्विंटल दराने रु. २९,४०० ला विकला. याशिवाय केवळ सहा गुंठे क्षेत्रातून त्यांनी रु. १८,००० किमतीचा कांदा घेतला. अशा प्रकारे त्यांनी सन २०१९-२० मध्ये केवळ चार एकर शेतीमध्ये रु. १,९४,६०० एवढ्या एकूण किमतीचा शेतमाल विकून रु. ६२००० एवढा खर्च वजा जाता रु. १,३२,००० एवढा निव्वळ नफा मिळविला. रिलायन्स फाऊंडेशनच्या मध्यस्तीनंतर; बियाणे, पीक संरक्षण, खते आणि शेतीकामे इत्यादींवर एकूण समतुल्य खर्च तंत्रज्ञानाच्या अवलंबनामुळे आधीपेक्षा २५ टक्क्यांनी कमी झाला. अर्थात, त्यांचे निव्वळ वार्षिक उत्पन्न आधीच्या फक्त २९,४०० रुपयांवरून रु. १,३२,००० म्हणजेच साडेचार पटीने वाढले आहे. याशिवाय त्यांनी याच वर्षी तीन एकर शेती मक्त्याने करून त्यामधून सुद्धा सुमारे एक लाख निव्वळ नफा मिळविला आहे. अशा प्रकारे त्यांनी सन २०१९-२० मध्ये एकूण रु. २,३२,००० एवढा निव्वळ नफा मिळवला आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने सन २०१८-१९ मध्ये देखील त्यांना अश्याच प्रकारे फायदा झाला असून गेल्या दोन वर्षात त्यांनी एकूण रु. ३.५० लाखांच्या वर निव्वळ नफा मिळवला आहे. या मिळकतीतून त्यांनी शेतामध्ये विहीर खोदून ओलितासाठी तुषार संच बसविला आहे. त्यांनी आधीच्या पारंपारिक आणि कोरडवाहू शेती पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आधुनिक जल सिंचन पद्धत, सेंद्रीय आणि संवर्धित शेती, बीज प्रक्रिया, स्वतः उत्पादित बियाणे वापरणे, रासायनिक खते आणि कीटक नाशके यांचा कमीतकमी वापर करणे, इत्यादी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्यांच्या मुलाला त्या कृषि पदवीचे शिक्षण देत आहेत. गत दोन वर्षांपासून त्या गावातील २० ते २५ शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शन करतात आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संपर्कात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करतात. “शेतीचे तंत्रज्ञान सोपे आहे व ते अंगीकारल्यास भरपूर फायदा होतो हे रिलायन्स फाउंडेशनच्या संपर्कात आल्यानंतर मला समजले. साधे व सोपे तंत्रज्ञान वापरून आपणास खूप फायदा मिळविता येतो.”– सौ. शारदा सुभाष पिसे, मोबाईल क्र. ७०३ ८५६ ५१९५.

Comments

Loading...