महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा एका बाजूला नेहमी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असला तरी दुसऱ्या बाजूला कोणत्याही गोष्टीमुळे निराश न होता जिद्द आणि निष्ठेने शेती करून आदर्श निर्माण करणारे शेतकरी देखील याच जिल्ह्यात भरपूर आहेत. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ग्राम रासा येथील श्री. निखील प्रभाकर आसूटकर (२६) हा युवक याचे उत्तम उदाहरण आहे. त्याने सर्व अडचणी आणि संकटांना न जुमानता शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करीत शेतीमधील उत्पन्न तिप्पटीच्या आसपास नेले आहे. आपल्या आई वडिलांसह राहणाऱ्या निखीलकडे रासा या गावी पाच एकर कोरडवाहू आणि पाच एकर ओलिताची अशी एकूण १० एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे. सिविल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला निखील शेतीच्या तंत्रज्ञानाचा शोध घेतच होता. परंतु, स्वतःचे शेतीचे तांत्रिक प्रश्न सोडविण्यासाठी त्याला नवीन तंत्रज्ञान सहज उपलब्ध होत नव्हते; त्यामुळे त्याला पारंपारिक पद्धतीनेच शेती करावी लागायची.
सुरुवातीला निखील खरीप हंगामात कापूस (कोरडवाहू आणि बागायती) आणि आंतरपीक म्हणून तूर तसेच रबी हंगामात बागायती गहू ही पिके घ्यायचा. मागील पाच वर्षांपासून शेती करीत असला तरी त्याला अपेक्षित उत्पन्न आणि फायदा मिळायचा नाही. दोन वर्षांपूर्वी, सन २०१७-१८ मध्ये त्याच्या पारंपारिक पद्धतीने केलेल्या १० एकर शेतीतून त्याला रु. ३.८३ लाख (सन २०१९ शी समतुल्य) किमतीचा माल उत्पादित झाला होता. परंतु त्यासाठी मशागतीची कामे, बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी इत्यादी बाबींवर सुमारे २.४८ लाख रुपये एवढा उत्पादन खर्च आला. हा खर्च वजा केल्यास त्याला वर्षाकाठी केवळ रु. १.३५ लाख एवढे निव्वळ उत्पन्न मिळाले होते. अंगमेहनतीची कठीण कामे, जोखिम आणि शेतीसाठी द्यावा लागणारा वेळ इत्यादी बाबींचा विचार केल्यास एवढी कमी मिळकत त्याला परवडणारी नव्हती. शिवाय, वरचे वर होणाऱ्या खर्चामुळे त्याच्या हाती पैसा शिल्लक उरत नव्हता. वडिलोपार्जित कच्च्या मातीच्या साध्या घरातच तो त्याच्या आई-वडिलासोबत राहत होता. अशा विपरीत परिस्थितीत निखीलला सन २०१८ मध्ये रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवेद्वारे शेतकऱ्यांसाठी शास्त्रज्ञांमार्फत शेती तंत्रज्ञानाविषयी योग्य वेळेत आणि मोफत मार्गदर्शन केल्या जात असल्याची माहिती मिळाली. तो लगेच रिलायन्स फाऊंडेशनच्या शेतकरी व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये सहभागी झाला. याशिवाय त्याने रिलायन्स फाऊंडेशनच्या हेल्पलाईन, ध्वनी संदेश, ऑडिओ कॉन्फरन्स व इतर कार्यक्रम इत्यादींचा सुद्धा लाभ घेणे सुरु केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ येथील शास्त्रज्ञांनी आणि इतर कृषि तज्ञांनी त्याला फाऊंडेशनच्या प्रामुख्याने व्हाट्स अॅप आणि इतर विविध कार्यक्रमांमधून शेती तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोगाबाबत प्रोत्साहित केले आणि त्याच्या शेती तंत्रज्ञानाविषयीच्या समस्यांना नियमित उत्तरे दिली. पिकांच्या उत्पादन वाढीसाठी विविध शेती तंत्रज्ञानाचा नेमका वापर करून पीक नियोजन कसे करावे, कमी खर्चात कीड व रोगांपासून प्रभावीपणे पिकाचे संरक्षण कसे करावे, नेमकी खते कोणती व केंव्हा द्यावी इत्यादी तांत्रिक बाबींची माहिती त्याला मिळाली. त्यानुसार त्याने सन २०१८-१९ मध्ये पारंपारिक शेतीला फाटा देवून तज्ञांच्या सल्ल्याने शेती केली. पूर्वी तो रासायनिक खते, कीटकनाशके, संजीवके यांचा वाटेल तसा वापर करायचा. त्यामुळे त्याचा शेतीवरील उत्पादन खर्च तर जास्त होताच; शिवाय रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशके यांच्या अवाजवी आणि अनावश्यक वापरामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढून जमीन तसेच मालाची प्रत आणि उत्पादन या सर्व बाबींवर विपरीत परिणाम व्हायचा. रिलायंस फाउंडेशनच्या सतत संपर्कात राहून त्याने एकात्मिक पद्धतीने योग्य आणि आवश्यक वेळी, कीड-रोगानुसार निवड करून, योग्य प्रमाणात कीड व रोगनाशके यांची कमीत कमी फवारण्या करून कीडी व रोगांचे प्रभावी नियंत्रण केले. सोबतच एकात्मिक पीक पोषण पद्धतीचा अवलंब करून; रासायनिक तथा सेंद्रीय खते- शेणखत वापरून जमिनीची प्रत सुधारली. रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पेरणीपुर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे, पेरणीसाठी पट्टा पद्धत, लांब वरंबा -सरी पद्धत अशा छोट्या – छोट्या पण महत्त्वाच्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला. रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्काच्या पहिल्याच वर्षी; सन २०१८-१९ मध्ये; त्याचे कपाशीचे एकरी उत्पादन ७.०० क्विंटलवरून १२.०० क्विंटल, गव्हाचे ५.०० क्विंटलवरून ७.०० क्विंटल आणि आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीचे १.४० क्विंटलवरून २.०० क्विंटल असे वाढले. वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनातील ही वाढ पूर्वीच्या तुलनेत सरासरी दिडपटीपेक्षा अधिक आहे. याशिवाय त्याने विविध शेतीकामे आणि कृषि निविष्ठा इत्यादी बाबींवर येणाऱ्या खर्चावर एकूण ५४,२५० रुपयांची बचत केली. सन २०१८-१९ च्या खरीप हंगामात त्याने कोरडवाहू आणि ओलीताचा मिळून कपाशीचे ९० क्विंटल उत्पादन घेऊन तो रु. ५,५५० प्रती क्विंटल दराने सुमारे रु. ५.०० लाख ला विकला. त्याच शेतात त्याने तुरीच्या आंतरपिकापासून रु.५०,००० कमावले. याशिवाय, रबी हंगामात दीड एकरात रु. २१,००० ला गहू विकला. अशा प्रकारे त्याने २०१८-१९ मध्ये रु. ५.७१ लाख एवढ्या एकूण किमतीचा शेतमाल विकून रु. १.९१ लाख एवढा खर्च वजा जाता रु. ३.८० लाख एवढा निव्वळ नफा मिळविला. रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळच्या मध्यस्तीनंतर; बियाणे, पीक संरक्षण, खते, शेतीकामे इत्यादींवर एकूण समतुल्य खर्च तंत्रज्ञानाच्या अवलंबनामुळे आधीपेक्षा २२ टक्क्यांनी कमी झाला. अर्थात, त्यांचे निव्वळ वार्षिक उत्पन्न आधीच्या रु. १.३८ लाख रुपयांवरून रु. ३.८० लाख म्हणजेच तिप्पटीपेक्षा अधिक (७५ % ने) वाढले. निखीलने आपल्या पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत आपली आर्थिक तसेच सामाजिक प्रगती साधली आहे. मागील वर्षी त्याने त्याच्या जुन्या मातीच्या कच्च्या घरात सुधारणा करून नवीन घर तयार केले आहे. शेतीतून मिळालेल्या अधिकच्या उत्पन्नामुळे त्याने सर्व खाजगी कर्जाची परतफेड केली आहे. त्याने एक नवीन स्मार्ट फोन आणि मोटार सायकल सुद्धा नगदीने खरेदी केली आहे. त्याने ओलितासाठी शेतात तुषार सिंचन संच बसविले आहेत. त्याला आता कोणत्याही वस्तू आधीप्रमाणे उधार घ्याव्या लागत नाहीत. गावातील २० ते २५ शेतकरी त्याच्या संपर्कात असून त्यांना तो आधुनिक पद्धतीने कशी लागवड करावी, हवामानावर आधारित शेती तसेच तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करीतच राहतो. तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे एकूणच जीवनमान सुधारले आहे.